अहमदनगर : येथील पेमराज सारडा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय खेळाडू प्रणिती सोमण हिने हरियाणा येथील मोरनी हिल्स येथे झालेल्या १९ व्या राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत मास स्टार्ट, टीम रीले व टाईम ट्रायल या तीनही प्रकारात सर्वोत्कृष्ट खेळ करून तीन सुवर्णपदके पटकावत नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली. तिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रणिती सोमण हिने या आधीही राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये दोनवेळा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू व भारतातील सर्वोत्कृष्ट सायकलपटू होण्याचा बहुमान मिळवला आहे. यावर्षी तिने पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करून भारतातील सर्वोत्कृष्ट सायकलपटू होण्याची हॅट्ट्रिक केली आहे. याबाबत माहिती सांगताना ती म्हणाली, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन व पेमराज सारडा महाविद्यालयाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश मी मिळवू शकले आहे. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव, सचिव प्रा. संजय साठे व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"