अहमदनगर : इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी शांत न बसता प्रशासनाशी भांडू. प्रसंगी आपण दिल्लीत जाऊ, मंत्री महोदायांशी चर्चा करू त्यातूनही मार्ग निघाला नाही तर दिल्लीत आंदोलन करू. अहमदनगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु व्हावी, या मागणीसाठी विविध सामाजिक व प्रवासी संघटनांनी रेल्वे स्टेशनवर गांधीगिरी केली. याप्रसंगी जगताप बोलत होते.
आमदार संग्राम जगताप, जागरूक नागरिक मंचचे सुहास मुळे, प्रवासी संघटनेचे हरजितसिंग वाधवा, सामाजिक कार्यकर्ते कारभारी गवळी, अर्षद शेख, दत्ता गायकवाड, बहिरनाथ वाकळे, जालिंदर बोरुडे, कैलास दळवी, अशोक कानडे, प्रकाश कुलकर्णी, मन्सूर शेख आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाकडून रेल रोको आंदोलन करू नये, अशी विनंती आंदोलकांना करण्यात आली. प्रभारी स्टेशन मास्तर श्रीकांत परोडा व वाणिज्य निरिक्षक एस.एम. वेदपाठक यांनी नगर- पुणे इंटरसिटी रेल्वेबाबत सर्वे करून सुरु करणार आहोत, असे लेखी आश्वासन यावेळी दिले.
आमदार जगताप म्हणाले, नगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु व्हावी यासाठी विविध प्रवासी व सामाजिक संघटनांनी सुरु केलेले आंदोलन महत्वाचे आहे. पुण्याला जाण्याऱ्या सर्वसामान्यांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी अल्प दरात सोय होण्यासाठी ही रेल्वे सुरु होणे गरजेचे आहे. आता स्पीड लिमिट असल्याने वाहनेही फस्ट चालवली तर दंड होतो. आंदोलनाला मी पाठींबा देत आहे.
सुहास मुळे म्हणाले, आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने जरी लेखी आश्वासन दिले असले तरी एक महिन्यत ही गाडी सुरु झाली नाहीतर आम्ही दिल्लीत रेल्वे मंत्र्यांच्या दालनात धरणे आंदोलन करू. हरजितसिंग वधवा म्हणाले, नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही रेल्वे सुरु होणे अत्यावश्यक आहे. अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. अर्षद शेख म्हणाले, नगर शहराचा विकास थांबल्याने हे शहर आता निवृत्त नागरिकांचे शहर होत आहे. आमची सहनशीलता आता संपली आहे.