अहमदनगर : शहरातील मंगलगेट येथे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरन दोन गटात चांगलाच राडा झाला़ तलवार, चाकू लांकडी दांड्याचा वापर करन एकमेकांना मारहाण झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून, शिवसेनेच नगरसेवक सचिन जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर उपजिल्हाध्यक्ष पवन भिंगारे यांच्यासह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मंगलगेट येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रशांत बापू काळे यांच्यासह अक्षय भिंगारे, तुषार मुळे, मयूर कराळे हे देवीच्या मंदिराजवळ उभा असताना त्या ठिकाणी पवन भिंगारे, अन्नू भिंगारे, सोन्या भिंगारे, मयूर भिंगारे, विठ्ठल उपळकर, रोहन निंबाळकर, शुभम लोंकरकर, स्वप्निल भिंगारे, अभिषेक भिंगारे यांच्यासह २० ते २५ आले़ रागाने का पाहतो असे म्हणत या जमावाने तलवार व लाकडी दांड्याने मारहाण केली, असे प्रशांत काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चंद्रा परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगलगेट हवेली येथे दुकानात असताना स्वप्नीन बेंद्रे, अक्षय भिंगारे, प्रशांत काळे, तुषार मुळे, किशोर बेंद्रे, नंदू बेंद्रे, ओंकार साळवे, सतीश काळे, नगरसेवक सचिन जाधव यांनी चाकुने मारहाण केली़ याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात शक्तीप्रदर्शन
मंगलगेट येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दोन्ही गट फिर्याद दाखल करण्यासाठी आले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. पोलीसांनी अनेकांना प्रवेशद्वाराबाहेरच थांबविले़ यावेळी राष्ट्रवादीचे नगरसवेक व पदाधिकारी तर सेनेचेही पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही गटाने यावेळी ठाण्यातही शक्तीप्रदर्शन केले.