- प्रशांत शिंदेअहमदनगर - प्रवरा नदी पात्रातील वाळू उपशाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला यश आले आहे. ३ जूनपर्यंत संबंधित वाळू डेपो बंद करुन चौकशी करण्याचे आदेश सोमवारी देण्यात आले आहेत. यामध्ये वांगी बु. एकलहरे ता. श्रीरामपूर, लाख ता. राहुरी, पाथरे बु, भगवतीपुर, दाढ बु. ता. राहाता, आश्वी खु. शिबलापूर ता. संगमनेर येथील डेपो बंद करण्यात आले आहेत.
यानंतर शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले आंदोलन मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने मागे घेतले आहे. या आंदोलनात राहुरी तालुक्यातील सात्रळ, सोनगाव, धानोरे तसेच राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपुर, हनुमंतगाव, पाथरे येथील शेतकरी सहभागी झाले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाचे प्रमुख अरुण कडू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे, आदिनाथ दिघे, बापूसाहेब दिघे, भास्कर फणसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, गौण खनिजचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली परंतु यातून तोडगा निघाला नव्हता. यानंतर जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्यासोबतची चर्चा निर्णायक ठरली.
यानंतर सोमवारी रात्री उशिरा गौण खनिज शाखेचे अधिकारी आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र घेऊन आले होते. यामध्ये तक्रारदारांच्या मुद्द्यांची चौकशी करुन ३ जूनपर्यंत अहवाल सादर करावा. तोपर्यंत संबंधित वाळू डेपो बंद ठेवावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिला. या पत्रानंतर चौकशी होईपर्यंत आंदोलन स्थगित करत आहेत, असे अरुण कडू पाटील यांनी सांगितले.