- चंद्रकांत शेळके अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यांनंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, परीक्षा झालेल्या इतर संवर्गाचे निकाल अद्याप लागले नाहीत, तर आरोग्यसेवकसह अन्य संवर्गाची परीक्षा होणेही बाकी आहे.राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्ग प्रवर्गातील पदभरतीची जाहिरात ॲागस्टमध्ये प्रसिद्ध झाली. यात नगर जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ९३७ पदांसाठी ४४ हजार ७२६ अर्ज दाखल झाले. नियोजनाअभावी अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर ७ ॲाक्टोबर २०२३ रोजी वरिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. पुढील तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने विविध संवर्गाच्या परीक्षा झाल्या. दरम्यान, सव्वातीन महिन्यांनंतर प्रथम झालेल्या वरिष्ठ सहायक संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ६२८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. ‘आयबीपीएस’ कंपनीने परीक्षा घेऊन निकाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे सुपूर्त केला. त्यानुसार हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षा झालेल्या उर्वरित पदांच्या निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, निकाल जाहीर झाल्यावर आता निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन त्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. पाच संवर्गांची परीक्षा अद्याप बाकी९२७ पदांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहेत. अखेरची औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा २६ डिसेंबर २०२३ रोजी झाली. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के), आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक व अंगणवाडी मुख्य सेविका या पाच संवर्गांची परीक्षा होणे अद्याप बाकी आहे. ३५ जणांचीच होणार कागदपत्र पडताळणीवरिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गातील ७ पदांसाठीची परीक्षा एकूण ६२८ उमेदवारांनी दिली. २०० गुणांची ही परीक्षा होती. यात ९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ३७७ जणांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातून ३५ जणांनाच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे. यात १७८ गुण मिळवणारा उमेदवार यादीत प्रथम क्रमांकावर आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद पदभरतीत पहिल्या संवर्गाचा निकाल जाहीर, वरिष्ठ सहायकच्या ७ जागा भरणार
By चंद्रकांत शेळके | Published: January 19, 2024 11:31 PM