- चंद्रकांत शेळकेअहमदनगर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपात मंगळवारी पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले. दुसरीकडे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संपात सहभागी झाल्याने शाळांना सुटी देण्यात आली होती.
जिल्हा परिषदेमध्ये जुन्या पेन्शनसाठी ग्रामसेवक, जिल्हा परिषद कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, लिपिक वर्गीय आदी संघटनांनी आक्रमक आंदोलन केले. यावेळी एकनाथ ढाकणे, संजय कडूस, सुभाष कराळे, अरुण जोर्वेकर, विकास साळुंके, शशिकांत रासकर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मात्र आपापल्या दालनात कोणीही गेले नाही. त्यामुळे दिवसभरात कोणतेही कामकाज झाले नाही.
जुनी पेन्शन योजनेसह कंत्राटी, अंशकालीन, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, विनाअट अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या मिळाव्यात, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, आगाऊ वेतन वाढीचे धोरण लागू करावे, चतुर्थश्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी हटवावी, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण बंद करावे आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेसह साडेचार हजार प्राथमिक शाळांचे १२ हजार शिक्षक, ८०० माध्यमिक शाळांचे १० हजार शिक्षक, तर ३५० उच्च माध्यमिक शाळांचे २ हजार प्राध्यापक असे एकूण २४ हजार शिक्षक संपात सहभागी झाल्याने सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद होत्या. संपाबाबत तोडगा निघाला नाही तर आणखी काही दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.
शिक्षक संपात असले तरी दहावी-बारावी परीक्षांसाठी लागणारे मनुष्यबळ कार्यरत आहे. हे कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहेत, मात्र मस्टरवर सही न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे संपाचा दहावी-बारावी परीक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही.