अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. आज सकाळी निवडणूक सभेत पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी हे सभापतीपदी वाकळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. भाजपसह शिवसेना आणि मनसे सदस्यांच्या पाठिंब्याने वाकळे सभापती झाले आहेत.
महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. वाकळे यांनी बुधवारीच अर्ज दाखल केला होता. गुरुवारी अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्याने वाकळे यांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाल्याचे स्पष्ट होते. मात्र अधिकृत घोषणा आज करण्यात आली. वाकळे यांच्या अर्जासाठी भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांची सही असल्याने बंडखोर गटाकडून सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. स्थायी समितीवर वाकळे यांची नियुक्ती ही शिवसेनेच्या कोट्यातून झाली. यावेळी स्थायी समितीच्या १६ सदस्यापैकी १२ सदस्य हजर होते. तर राष्ट्रवादीचे बंडखोर बाळासाहेब बोराटे, ख्वाजाबा कुरेशी, समद खान तसेच कॉग्रेसचे मुदस्सर शेख गैरहजर होते. याशिवाय शहर भाजपच्या वतीने या निवडीवर बहिष्कार टाकण्यात आला होता, त्यामुळे भाजपाचा एकही पदाधिकारी निवडणुकीकडे फिरकला नाही.वाकळे दुस-यांदा सभापतीभाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यापूर्वी आॅगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत स्थायी समितीचे सभापती होते. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या सत्ताकाळात ते सभापती होते. ते आता दुस-यांदा सभापती झाले आहेत. २०११-१२ मध्ये ते सभागृह नेते होते. मी कोणत्याच गटाचा नव्हे तर भाजपचा नगरसेवक आहे. पक्षातील सर्व श्रेष्ठी समान आहेत. पद सोडून प्रायश्चित्त घेण्यापेक्षा पदाच्या माध्यमातून चांगली विकास कामे केली तर ते उत्तम ठरेल, असे वाकळे म्हणाले.