वाहतूक कोंडीत प्रवासी गुदमरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:54 PM
शहरातील वाहतूक कोंडी आता प्रवाशांना नवीन राहिलेली नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ वाहतूक कोंडीत नगरकरांसह बाहेरील प्रवाशांचा जीव गुदमरत असताना पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
अहमदनगर : शहरातील वाहतूक कोंडी आता प्रवाशांना नवीन राहिलेली नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ वाहतूक कोंडीत नगरकरांसह बाहेरील प्रवाशांचा जीव गुदमरत असताना पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. सोमवारी दुपारी स्टेशन रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली. दिवाळीची गर्दी, तसेच शहरातील बंद असलेले सिग्नल यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, सोलापूर, मनमाड आदी शहरातून जाणाºया महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागत आहेत. यात नगर-पुणे रस्ता कायम वाहतूक कोंडीत सापडलेला असतो. सोमवारी सकाळपासून शहरातील स्टेट बँक चौक, चांदणी चौक, मार्केट यार्ड, इम्पिरिअल चौक, सक्कर चौक या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते, परंतु सिग्नल बंद असल्याने तसेच दुचाकीस्वार बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याने वाहतूक सुरळीत करणे पोलिसांना अशक्य होत होते. पाच तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहने अगदी रेंगाळत होती. रस्त्यावर केवळ कर्णकर्कश हॉर्नचा आवाज व वाहनांचा धूर दिसत होता. वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष वाघेला हे त्यांच्या पथकासह वाहतूक सुरळीत करीत होते. परंतु वाहतूक नियंत्रित होत नव्हती. त्यामुळे त्यांनी आणखी कर्मचारी मदतीसाठी मागवले. अखेर मुख्यालयातील स्टॉकिंग फोर्स पथक मदतीला धावल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. -----------रुग्णवाहिका अडकली सकाळपासूनची वाहतूक कोंडी दूर होते ना होते तोच सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान, सक्कर चौकात पुन्हा वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. एवढ्यात पुण्याकडून नगरच्या दिशेने एक रुग्णवाहिका कशीबशी मार्ग काढत आली. परंतु सक्कर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने ती रुग्णवाहिका अडकून पडली.