अहमदनगर : महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात सूत्रधार म्हणून आरोप असलेला आणि गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार असलेला महापालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदस सातपुते सोमवारी अखेर तोफखाना पोलीसांना शरण आला.सातपुतेच्या विरोधात न्यायालयाने स्टॅडिंग वॉरंट काढले होते. महापालिकेत संगनमताने ३४ लाख ६५ हजार ४४१ रुपयांचा पथदिवे घोटाळा केल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांनी २९ जानेवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्याद दाखल होताच पोलीसांनी भरत काळे याला अटक केली. या प्रकरणी विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, ठेकेदार सचिन लोटके, उपायुक्त विक्रम दराडे व मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. सातपुते वगळता पोलीसांना पाच जणांना अटक केली. दराडे व झिरपे यांना जामीन मिळाला असून, काळे, सावळे, लोटके हे न्यायालयीन कोठडीत आहेत.तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी लिपिक भरत त्रिंबक काळे याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आता सातपुते हजर झाल्याने पोलीस लवकरच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे समजते.
अहमदनगर महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सातपुते पोलीसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:34 PM