काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शेतकरी धोंडीबा पानसरे यांनी नर्सरीची शेती करताना ३० वषापुर्वी बांधावर सागाची १०० झाडे लावली. यातील काही झाडांच्या लाकडापासून सुमारे एक कोटी रुपये किंमत असलेल्या वुडन फर्निचर भिंती व पृष्ठभाग सजवला. बांधावर लावलेल्या सागाच्या झाडातून वातानुकूलित फार्म हाऊस त्यांनी निर्माण केले आहे.या नैसर्गिक वातानुकूलित हाऊसचे उद्घाटन राहुरी कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ के. पी. विश्वनाथा यांचे हस्ते झाले. हे फार्म हाऊस पाहून विश्वनाथा यांनी समाधान व्यक्त केले.धोंडीबा पानसरे हे चौथी शिकलेले शेतकरी. ३० वषापुर्वी भविष्याचा वेध घेऊन त्यांनी नर्सरीची व्यवसाय सुरू केला. बाळासाहेब व संतोष या दोन मुलांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढविला.धोंडीबा पानसरे यांनी शेताच्या बांधावर ३० वर्षापुर्वी सागाची १०० झाडे लावली. दोन वर्षापुर्वी यातील काही झाड शासनाची परवानगी घेऊन तोडली. मुलांनी राहण्यासाठी शेतात दोन मजली फार्म हाऊस बांधले. या हाऊसमध्ये पृष्ठभाग, भिंती, जीना व कपाटे, बेड, खिडक्या, दरवाजे, मुख्य प्रवेशद्वार सागाच्या लाकडातून तयार केले आहे. या सागाची बाजारपेठेत किंमत सुमारे एक कोटी इतकी आहे. मुंबईतील सूतार कन्हैयालाल यांनी दीड वर्ष कलाकुसर केली. फार्म हाऊस पूर्ण सागात असल्याने हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड राहणार आहे.वडील कमी शिकलेले पण त्यांनी दुरदृष्टी ठेवली. बांधावर सागाची लागवड केली त्यामुळे सागातून वातानुकूलित फार्म हाऊस तयार करता आले, असे बाळासाहेब पानसरे यांनी सांगितले.
बांधावरील सागाच्या झाडापासून वातानुकूलित फार्म हाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 5:11 PM