अहमदनगर : महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने शिर्डी विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली. याशिवाय धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरही प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची आज ६३ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहातपार पडली. या बैठकित हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.राज्यात अनेक ठिकाणी विमानतळ कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रशिक्षण संस्थांसाठी विचारणा होत आहे. शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरील पायाभूत सुविधांचा वापर या प्रशिक्षण संस्थांना देण्यात येणार आहे. या संस्था खासगी सार्वजनिक सहभाग तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिर्डी येथील विमानतळ कार्यान्वित झाले आहे. या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले असून आवश्यक परवाने मिळाल्यानंतर लवकरच रात्रीच्या वेळीही विमान उतरण्यास सुरुवात होईल. यावेळी अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी यावेळी उपस्थित होते.