अकोले : दुधाच्या कमी झालेल्या भावासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करा, अन्यथा दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांच्या दारात दूध ओतून आंदोलन छेडू, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिला आहे.महागाईचा व उत्पादक खर्चाचा विचार करुन गायीच्या दुधाला किमान ५० रूपये व म्हशीच्या दुधाला ६५ रूपये भाव द्या, अशी समितीची मागणी असून त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महिनाभरात दूध दरात दहा रूपयांची घसरण झाली आहे. शासनाचे दर पत्रक धाब्यावर बसविले जात आहे. मात्र ग्राहकांना दूध विकताना एक रूपयाही कमी भाव झालेला नाही. शासनाने २१ जून २०१७ रोजी परिपत्रक काढून ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.गुणवत्तेच्या दुधाला प्रतिलिटर २७ रूपये भाव देणे बंधनकारक केले असताना आज या गुणवत्तेच्या दुधाला १८ रूपयांपर्यंत कमी भाव मिळत आहे. दुधाचा उत्पादन खर्चही यातून भरून निघत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत. सरकारने दूध भावाविषयी योग्य धोरण न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दूध दरवाढीसाठी दुग्धविकास मंत्र्याच्या दारात दूध ओतणार - अजित नवले यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:08 PM