अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 05:02 PM2024-10-06T17:02:26+5:302024-10-06T17:05:24+5:30

अजित पवार यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामांचा पाढा लोकांसमोर वाचून दाखवला.

Ajit Pawar Announced the name of one more candidate for the Legislative Assembly election in Jansanman Yatra | अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही आठवड्यांपासून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अजित पवार यांची ही यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे दाखल झाली होती. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामांचा पाढा लोकांसमोर वाचून दाखवला. तसंच विधानसभेसाठी आपल्या उमेदवाराची घोषणाही केली.

अजित पवार म्हणाले  की, "अकोल्यात एमआयडीसी उभी करण्यासाठी जी जागा आम्ही निवडली, त्या जागांची मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच पट जास्त मोबदला देण्यात आला. केंद्रात आपल्या विचारांचं सरकार असल्यानं कांदा निर्यातवरील बंदी आपण उठवली. ऊसाची एमएसपी (न्यूनतम समर्थन मूल्य) आम्ही वाढवली. मी शेतकऱ्यांना साथ देणारा शेतकरी पुत्र आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जी धमक असावी लागते, ती आमच्यात आहे. सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या दिशेनं पुढे जायचं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आशीर्वाद द्या, भक्कम साथ द्या. तमाम शासकीय योजना पुढची पाच वर्षे सुरूच राहतील, असा शब्द मी देतो. विधानसभा काही निवडणुकीसाठी ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपचे चिन्ह असेल. ही सर्व महायुतीची चिन्हे आहेत. तुमच्या मतदारसंघात घड्याळ हे चिन्ह असेल," असं म्हणत अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून  विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे हेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली.

लहामटे यांच्यावर स्तुतीसुमने

"अकोले विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामं झाली आहेत. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रत्येकवेळी कामांचा पाठपुरावा घेतला आहे. ते हक्काचे आणि कामाचे आमदार आहेत," अशा शब्दांत अजित पवार यांनी लहामटे यांचं कौतुक केलं. 

दरम्यान, "जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून तमाम शासकीय योजनांची माहिती आम्ही सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर माझ्या भगिनींना झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे देखील लवकरच मायमाऊलींच्या बँक खात्यात जमा होतील. गोरगरीबाची मुलगी शिकून पुढे मोठी होईल, स्वतःचे व कुटुंबियांचे स्वप्नं पूर्ण करेल, यासाठी शिक्षण आपण मुलींकरिता मोफत केलं. तीन घरगुती गॅस सिलिंडर आपण मोफत देऊ केले. शेतकरी बांधवांची वीज बिलं आपण माफ केली. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देऊ केलं. एक रुपयात पीक विमा योजना देऊ केली," असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
 

Web Title: Ajit Pawar Announced the name of one more candidate for the Legislative Assembly election in Jansanman Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.