मंत्री महोदयांच्या नावातील चूक पाहून अजित पवारांची 'भन्नाट रिॲक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:03 AM2021-11-22T10:03:18+5:302021-11-22T10:07:52+5:30
एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो.
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामात किती दक्ष असतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी, जिर्णोद्धार वाड्याच्या कोनशिलेवरील नाव पाहून त्यांनी कपाळावरच हात मारला. यावेळी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.
एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला. येथील कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चूक पाहिली अन् भन्नाट रिएक्शन दिली. हसन मुश्रिफ यांच्या नावातील चूक पाहून कपाळावरच हात मारला.
संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर यांच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोनशिलेवरील नावात असलेली चूक लक्षात आणून दिली. कोनशिलेवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफऐवजी ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती. हे पाहिल्यानंतर, अजित पवारांनी कपाळावर हात मारला. दरम्यान, मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले.