अहमदनगर : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजली आहे़. दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील हे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे़. दिवाळीत आकाशकंदिलाचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते़ घरांच्या छतावर, पडवीत हे कंदील लावले जातात़. दिवाळीनिमित्त बाजारात यंदा विविध आकार आणि प्रकारातील कंदील उपलब्ध झाले आहेत़. यंदा स्वदेशी बनावटीच्या कंदिलांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले़. काही प्रमाणात चीन बनावटीचेही कंदील बाजारात आहेत़. ग्राहकांनी मात्र हॅण्डमेड असलेल्या भारतीय कंदिलांनाच पसंती दिल्याचे दिसत आहे़. घुमट, त्रिकोणी, चौकोनी, चांदणी, लंबाकृती, गोलाकार, पॅरेशूट, हंडी या आकारातील कंदील कापड, स्पंज, कागद, बांबूच्या काड्या, लाकूड यापासून बनविलेले आहेत़. या कंदिलांवर रंगीबेरंगी कागद व मोत्यांची डिझाईन बनविलेली आहे़. ५० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत आकाशकंदिल विक्रीसाठी उपलब्ध आहेत़. नगर शहरात मुंबई, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणातून आकाशकंदिल आणले जातात़. काही ठिकाणी स्थानिक कारागिरही कंदील बनवितात़. अॅटोमॅटिक कंदिलांनाही ग्राहकांची पसंती पारंपरिक आकाशकंदिलांसह विविध रंगातील रेडिमेड लाईटिंग असलेले आकाशकंदिल इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये दाखल झाले आहेत़. या कंदिलांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे़. यंदा कंदिलाच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे़. शहरासह जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून चांगला पाऊस झाल्याने दिवाळी खरेदीसाठी बाजारात उत्साह दिसत आहे़. त्यामुळे दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे़. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक आकाशकंदिल दाखल झाले आहेत़. कापडी आणि हॅण्डमेड कंदिलांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे़. येत्या दोन ते तीन दिवसांत खरेदीसाठी ग्राहकांची आणखी गर्दी वाढेल, असे विक्रेते नितीन एकाडे यांनी सांगितले.
नगरमध्ये राजस्थान, गुजरातचे आकाश कंदील बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 1:30 PM