अकोले : शहर व तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरु असून, त्यामुळे गावकरी रात्र जागून काढत आहेत़ शुक्रवारी पहाटे पुंजीराम विष्णु नाईकवाडी या शेतकऱ्याच्या घरात घुसून लहान मुलीच्या मानेला चाकू लावून चोरट्यांनी ३० हजार रुपये व अडीच तोळे सोने असा ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरु असून पाळत ठेवून चोऱ्या होत असल्याने भुरट्या चोरांवर संशय बळावला आहे. कारखाना रस्त्याच्या कडेला पुंजीराम नाईकवाडी यांचे घर असून पहाटे घरातील माणसे प्रातविधीला गेले असता चोरांनी घरात प्रवेश केला़ नाईकवाडी यांच्या लहान मुलीच्या मानेवर चाकू धरुन नाईकवाडी कुटूंबाला चोरट्यांनी धमकावले़ त्यानंतर घरातील तीस हजार रुपये व अडीच तोळे सोने असा ८० हजाराचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला़ गुरुवारी नाईकवाडी यांनी गाय विकली होती़ ती रक्कम चोरट्यांनी पाळत ठेवून लांबवल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान कोतूळ येथेही चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून दुकान, घरफोड्यांचे सत्र सुरु आहे. कोतूळ गावातील देशी दारुचे दुकान चोरांनी फोडले. (तालुका प्रतिनिधी)
अकोल्यात धाडसी चोरी
By admin | Published: August 30, 2014 11:14 PM