अकोले : फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.आदिवासी समाज मातृसत्ताक संस्कृती जपणारा असला तरी वास्तवात स्त्रियांची अवहेलना होताना व त्यांच्या हक्कांची पायमल्ली होताना दिसत आहे. त आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. आदिवासी महिला केंद्रीत साहित्य निर्मितीला प्राधान्य दिले गेले तरच आदिवासी संस्कृती अबाधित राहील, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा कवयित्री कुसूम आलाम (गडचिरोली) यांनी केले. कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे झारखंडमध्ये आदिवासी विस्थापित होत आहेत. विस्थापित होण्याच्या मोठ्या समस्येमुळे येथील आदिवासी संस्कृती व साहित्य धोक्यात आले आहे. मराठी साहित्य हिंदीत अनुदानित झाले आणि ते झारखंडमधे पोहचले तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे मत जेष्ठ साहित्यिक महादेव टोप्पो(रांची) यांनी व्यक्त केले. जल, जंगल, जमीन यातच आदिवासींच्या संस्कृती असून आदिवासींच्या साहित्य संस्कृती जतन करण्यासाठी जंगल संपत्ती टिकली पाहिजे. त्यासाठी वन कायदे अधिक कडक व्हावेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी.तसेच वन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन सजगतेने व्हावे असा सल्ला सांगल्याभाई वळवी (गुजरात) यांनी यावेळी दिला. यावेळी बियाणे बँक चालविणाºया राहीबाई पोपेरे, इंद्रजित गावित, फडकीचे अध्यक्ष डॉ.संजय लोहकरे, मारूती लांघी, डॉ.तुकाराम रोंगटे, सुनील गायकवाड, उपसभापती मारूती मेंगाळ आदी उपस्थित होते.अमू अक्का एक हो....!‘अमु अक्का एक हो...!’ म्हणजे आम्ही सर्व ‘श्रमिक, कष्टकरी, शेतकरी,उपेक्षितांचं जगणं वाट्याला आलेले, धनिकांकडून शोषण केले गेले, सतत हेटाळले गेलेले’ एक आहोत. भाजप व संघवाले बोलायला चतुर आहेत. आदिवासींना वन निवासी म्हणून हेटाळत आहेत. शेतकºयांच्या पोरांची एकी त्यांना बघवत नाही. शेटजी-भटजींच्या विरोधात प्रांतिक,भाषिक, जातीय, धर्मीय असे सर्व भेद बाजूला ठेऊन शेतकरी श्रमिकांची एकीची मूठ घट्ट केली पाहिजे. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे व भयावह किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतजमीन, माती वांझ,निर्जिव होत चालली आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. सर्व भेद विसरुन शेतकºयांच्या मुलांनी ‘घामाचं योग्य दाम’ मिळविण्याच्या लढ्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहन मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले.