अकोले : देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती. यावेळी मात्र ती आघाडी थोपविण्यात आली. तालुक्याचे भूमिपुत्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना डावलून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना अकोलेतून मतांची चांगली आघाडी मिळाली.अकोले तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटात तीन भाजपा, एक सेना व दोन राष्ट्रवादी असे बलाबल आहे. गतवेळी या मतदारसंघात सेनेला ४ हजार ५९१ मतांची आघाडी होती. यावेळी वैभव पिचड हे कंबर कसून होते. विधानसभा निवडणूक जवळ असल्याने त्यांनी जोरदार बांधणी केली. दोन्ही कॉंग्रेसने ‘पंजा’ गावोगाव पोहोचविला.भाजप-सेनेत गट-तट असले तरी सर्वांनी एकत्र येऊन मनापासून मुळापर्यंत प्रचार केला तरी शिवसेनेला तालुक्यात आघाडी मिळू शकली नाही. कॉंग्रेसच्या कांबळे यांना ३१ हजार ६५१ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली. अन्य कुठल्याही मतदारसंघात ते आघाडीवर नाहीत. केवळ अकोल्याने त्यांची पत राखली. कांबळे यांना ८१ हजार १६५ मते मिळाली. अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना तालुक्याने १० हजार ३५६ मते दिली.मुळा खोरे आणि पठारावरील गावांचा मुंबईशी दांडगा संपर्क असल्याने येथील गावांचा कल दरवेळी सेनेकडेच असतो. तो यावेळी दिसला नाही. पिचड पिता-पुत्रांनी विधानसभेची नांदी समजून प्रचार केला. भाजपचे अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ.किरण लहामटे, जालिंदर वाकचौरे, सेनेच्या सुषमा दराडे, मधुकर तळपाडे यांनी आपआपले गटातील बुरुज पक्के करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसला आघाडी मिळाल्याने राष्टÑवादी विधानसभेसाठी बळकट झाली आहे.पिता-पुत्रांना यशअहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात तेथे सर्वत्र सेना-भाजपला आघाडी आहे. अपवाद फक्त अकोले विधानसभा मतदारसंघाचा आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन पिचड हे आक्रमक असतात. आदिवासी समाज सेना-भाजपला पाठिंबा देताना दिसत नाही. याहीवेळी धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण नको या मुद्यावर तीव्र भावना होत्या. त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळाला. देशभर मोदी लाट असताना अकोल्यात कॉंग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाल्याने राष्टÑवादीचे मनोबल वाढले आहे.की फॅक्टर काय ठरला?धनगर समाजाला आदिवासी संवर्गात आरक्षण मिळेल की काय? या मुद्यावरुन आदिवासी समाज भाजपवर नाराज आहे.शेतकऱ्यांची सरकारविषयी असलेली नाराजी मतात रुपांतर करण्यातही राष्टÑवादीला यश आले आहे.पठारावरील गावांचा मुंबईशी दांडगा संपर्क असल्याने येथील गावांचा कल दरवेळी सेनेकडेच असतो. परंतु यावेळी तो दिसला नाही.
विद्यमान आमदारवैभव पिचड। राष्टÑवादी