अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात, संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग व राजापूर परिसरात तर राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, कोल्हार परिसरात सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले. नेवाशात मंगळवारी (दि.२०) दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडविली. काढलेली पिके पावसाने झोडपली. अनेकांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले.संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, प्रतापपूर, ओझर, कनोली, चिंचपूर, खळी, पिप्रीं-लौकी अजमपूर, निमगावजाळी, जोर्वे, चणेगाव, कौठे-मलकापूर, अंभोरे, कोची, मांची, मालुंजे, पिंपरणे, हजारवाडी, पानोडी, शिबलापूर, औरंगपूर, रहिमपूर, मनोली आदी गावात सोमवारी दुपारी तीन वाजता कमी, जास्त प्रमाणात पाऊस झाला. जवळेकडलग येथे मका, कांदा आदी पिकांबरोबरच द्राक्ष व डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जवळेकडलग येथील शेतकरी विजय देशमुख यांनी दिली. राजापूर येथेही पावसाने पिकांचे नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने शिवारात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर महावितरणचे खांब, विज वाहक तारा खाली पडल्याने विजपुरवठा खंडित झाला. राजापूर-जवळे कडलग रस्त्यावरही झाडे पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी मनोज रामभाऊ हासे, दशरथ लहानू हासे, सचिन बाळासाहेब हासे आदी शेतक-यांनी केली आहे.
अकोले, संगमनेर, राहात्यानंतर नेवाशाला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 3:52 PM