अकोले : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सरपंचपदासाठी १०० तर सदस्यपदासाठी १९८ उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. पैकी सरपंचपदासाठीचे ९ तर सदस्यपदासाठीचे २३ उमेदवारी अर्ज बुधवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले आहे. १५ सप्टेंबरला माघारीनंतर निवडणूक रणसंग्रामचे चित्र स्पष्ट होणार असले तरी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने बहुतांशी ग्रामपंचायतींमधे सदस्यपदे रिक्त राहणार आहेत.अकोले विधानसभा मतदार संघातील पहिले गाव पाचपट्टावाडी, लाडगाव, देवगाव, मुतखेल, कोहणे, रेडे, वांजुळशेत-पुरुषवाडी, रतनवाडी, पिंपळदरावाडी, जहगिरदरावाडी, पेढेवाडी, तिरडे-शिवाजीनगर, कुमशेत, पेंडशेत, सुगाव बुद्रक, पाचनई, अंबित-शिरपुंजे खुर्द, शिसवद, बारी, साम्रद, कोकणवाडी या २१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक सुरु आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी ६० इच्छुंकानी अर्ज दाखल केले. मुतखेल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक १३ अर्ज दाखल झाले आहेत. लाडगाव ग्रामपंचायत सदस्यपदासाठी केवळ ४ तर दुर्गम आदिवासी क्षेत्रातील कुमशेत ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी ५ अर्ज दाखल झाले असून कोहणे व साम्रद येथे सदस्यपदासाठी प्रत्येकी ६ अर्ज आले आहेत. या चार ग्रामपंचायतीत उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सदस्य पदे रिक्त राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, भाजपचे अशोक भांगरे यांनी या निवडणुकांमधे लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.