अहमदनगर : अकोले पोलीस ठाण्यात राडा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अकोले पोलीस ठाण्यात १८ एप्रिल रोजी रात्री दोन गटांनी आपापसांत शिवीगाळ करत आरडाओरडा करून हाणामारी केली होती. पोलिसांसमोर बराचवेळ हा गोंधळ सुरू होता. या घटनेनंतर मात्र पोलिसांनी तत्काळ कुणावरही गुन्हा दाखल न करता काहीच कारवाई केली नाही. दरम्यान, या गोंधळाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेत याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस नाईक बारकू बाळू गोंधे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात राडा करणारे शिवाजी धुमाळ, बाबासाहेब नायकवाडी, सुमन जाधव, अनिकेत जाधव यांच्यासह इतर सात ते आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दखल घेत अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.