- मच्छिंद्र देशमुख अहमदनगर : अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी इंडोनेशियाचा निळा भात आसाम राज्यातून आणला. या भाताची प्रायोगिक तत्वावर लागवड केली. गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या बियाण्याच्या माध्यमातून यंदा तब्बल दहा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. ही यशोगाथा ‘लोकमत’ने प्रकाशित करून देशाच्या कानाकोपºयात पोहोचविली. या प्रयोगाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून ते गुरुवारी शेतकºयांशी संवाद साधणार आहेत.
निळ्या भाताचा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांनाही या भाताविषयी उत्सुकता निर्माण झाली. मुख्यमंत्री ठाकरे, कृषिमंत्री भुुसे गुरूवारी अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील शेतकºयांशी संवाद साधणार आहेत. मेहंदुरीतील शेतकरी विकास आरोटे यांनी तीन किलो बियाण्यांपासून दहा एकर क्षेत्रात लागवड केली.
कृषी विभागाच्या मदतीने आरोटे यांनी हा प्रयोग राबवला. गुरुवारी ‘विकेल तेच पिकेल’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री, कृषिमंत्री गुरुवारी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान आॅनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. त्यात मुख्यमंत्री थेट अकोल्यातील मेहंदुरीतील भात शेतात लाइव्ह दिसणार आहेत, असे जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.
हे होणार सहभागी
मुंबईतून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे. अकोले(मेहंदुरीतून ) : विकास देवराम आरोटे, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, लोकमत प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी.