योगेश गुंड
केडगाव : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुगंधित करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांचे मळे यंदाही बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बेरा यांसारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाली आहेत. मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यंदा उत्पादनात वाढ झाली आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाते. अकोळनेरसह कामरगाव, भोरवाडी, चास येथेही फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून याभागात फुलशेती केली जाते. एकट्या अकोळनेर गावातच जवळपास ५०० एकर क्षेत्रावर झेंडू, शेवंती व इतर फुलांची लागवड आहे. यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्डला पसंती आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपर व्हाइट, चांदणी, भाग्यश्री, पूजा व्हाइट, सानिया यलो, ऐश्वर्या, पौर्णिमा, पेपर यलो, सेंट व्हाइट यांसारखे शेवंतीचे प्रकारही आहेत. मार्च महिन्यात शेवंतीची लागवड केली जाते.
मागील वर्षी कोरोनामुळे फुलांची लागवड कमी असल्याने उत्पादनात घट झाली होती. यामुळे ऐन सणासुदीत फुलांचे भाव २०० रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेले होते. यावर्षीही भाव मिळतील यामुळे फूल उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो, मारीगोल्ड, गोल्डस्पोट, अष्टगंधा, पितांबर, मार्तंड, जेमिनी असे प्रकार आहेत. अकोळनेर येथील फुलांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, नागपूर, मुंबई, बडोदा यांसारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी आहे. मात्र नागपूर मार्केटमध्ये सर्वात जास्त माल जाऊनही तेथे शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाहीत, अशी खंत माजी सरपंच अनिल मेहेत्रे व शेतकरी तुषार मेहेत्रे यांनी व्यक्त केली.
---
पावसावरच बाजारभावाचे गणित
सततच्या खराब हवामानाचा फटका फुलांच्या पिकांवर बसून विविध रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. सध्या २० ते २५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत असून, त्यातून उत्पादन खर्चही भागत नाही. आता दसरा, दिवाळीत चांगला भाव मिळावा. जास्त पाऊस झाला तर फुलांची गुणवत्ता घसरते परिणामी भाव कमी मिळतो.
----
यंदा पाऊस कमी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त आहे. मंदिर सध्या बंद आहेत. त्यामुळे सध्या भाव जास्त नाही. दिवाळी, दसरा या सणात चांगला भाव मिळायला हवा. नाहीतर लागवडीसाठी केलेला खर्च व मेहनतही भरून येणार नाही.
- बाळासाहेब केरू जाधव, संतोष सुखदेव जाधव,
फूल उत्पादक, अकोळनेर
----
फोटो पाच आहेत २६ अकोळनेर, १,२,३,४
अकोळनेर येथे बहरलेले झेंडू, शेवंतीचे मळे. (छायाचित्र : नागेश सोनवणे)