सन २००० ते २०२० या कालखंडातील प्रकाशित साहित्याच्या सर्व प्रकारातील पुस्तके अक्षरवैभवतर्फे मागविण्यात आली होती. त्यातून साहेबराव ठाणगे यांच्या चांगभलं या ललित लेखसंग्रहाला अक्षर वैभव ललित लेख पुरस्कार, तर बाळासाहेब चव्हाण लिखित बळी या नाटकास अक्षरवैभव नाट्य पुरस्कार, शिवाजीराव काकडे लिखित आबासाहेब आणि मी या चरित्रग्रंथास अक्षरवैभव चरित्रलेखन पुरस्कार, पुंजाहरी सुपेकर यांच्या जंगलातील पाहुणा या पुस्तकास बालसाहित्य पुरस्कार, आबासाहेब उमाप यांच्या वेदनेला पंख फुटले या कवितासंग्रहास काव्य पुरस्कार घोषित करण्यात आले.
प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेल्या आणि तीच थीम पकडून आबासाहेब उमाप यांनी 'वेदनेला पंख फुटले' हा काव्यसंग्रह लिहिला आहे. समाजातील नष्ट होत चाललेल्या नीतीमूल्यांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांचा वेध घेत अनिष्ट प्रथांवर 'चांगभलं' या पुस्तकातून साहेबराव ठाणगे यांनी कोरडे ओढले आहेत. पुंजाहरी सुपेकर यांनी कल्पनारम्य मांडणी करून 'जंगलातील पाहुणा'मध्ये वेगळा आणि दखलपात्र प्रयोग केला आहे. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अनमोल कामगिरी करणाऱ्या परंतु काहीसे उपेक्षित राहिलेल्या आबासाहेब काकडे यांच्या चरित्राचा लक्षणीय वेध शिवाजीराव काकडे यांनी 'आबासाहेब आणि मी' या चरित्र लेखनात केला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांचे प्रभावी चित्रण 'बळी ' या समस्याप्रधान नाटकात बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. परीक्षण समितीने या कलाकृतीचे मूल्यमापन करून पुरस्कारांसाठी निवड केल्याचे शब्बीर शेख, कार्यवाहक रचना यांनी सांगितले.