अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटातून चालकाला बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून दारूचा टेम्पो चोरट्यांनी पळविला; मात्र पोलीस पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास येताच चोरट्यांनी हा टेम्पो रस्त्यातच सोडून पोबारा केला.
२८ मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात टेम्पो चालक अन्सार हसन पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण हे २८ मे रोजी रात्री नगर-औरंगाबाद रोडने आयशर टेम्पोमध्ये १० लाख ३० हजार रुपयांची विदेशी दारू घेऊन जात होते. टेम्पो इमामपूर घाटात येताच चार चोरट्यांनी गाडी आडवी लावून टेम्पो अडविला. यावेळी पठाण यांना चाकू व बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील टेम्पो घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी पठाण यांनी १०० क्रमांकावर फोन करून नियंत्रण कक्षात या घटनेची माहिती दिली. या टेम्पोला जीपीएस बसविण्यात आले होते. त्यामुळे चोरटे हा टेम्पो घेऊन कुठे जात आहेत याचे लोकेशन पठाण यांच्याकडे होते. चोरटे हा टेम्पो घेऊन राहुरीच्या दिशेने जात असल्याचे समजले. याबाबत राहुरी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने या चोरट्यांचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करीत आहेत, हे लक्षात येताच चोरट्यांनी हा टेम्पो राहुरी जवळील चिंचोली फाटा येथे सोडून पसार झाले. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद जाधोर हे करीत आहेत.