महिला दिन विशेष
राहुरी : अनेक अडचणींचा सामना करीत शिल्लेगाव येथील अलका सुनील म्हसे यांनी पतीच्या निधनानंतर जिद्द न हरता यशस्वी वाटचाल केली आहे. पतीच्या निधनानंतर दुःख पचवून मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यात अलकाताई यशस्वी ठरल्या आहेत.
लग्नानंतर दहा वर्षांनी पतीचे निधन झाले. घरची परिस्थिती जेमतेम. अन्य कोणाचाही आधार नाही. पदरी दोनच छोट्या मुली. मोठी प्राजक्ता ही आठ वर्षाची होती. तर दुसरी प्रतीक्षा ही पाच वर्षाची होती. डोळ्यासमोर सगळा अंधार होता. पतीची तीन एकर जमीन होती. परंतु, भांडवल नाही. शेती करायची कशी? हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. दूध व्यवसायाचा आधार घ्यायचा ठरला. त्याचबरोबर आसपासच्या शेतात शेतमजुरी करून हातात खेळते भांडवल उभे केले. त्यातून एक गाय विकत घेतली. त्या गाईच्या दुधातून हातात भांडवल येऊ लागले. त्यातून एकाच्या दोन, दोनाच्या चार अशा एकूण लहान मोठ्या आठ गाई आहेत. या गाईंपासून सुमारे ३५ ते ४० लीटर दूध डेअरीला जाते. त्यातून भांडवल उभे राहिले.
या भांडवलातून शेती पिकवायला सुरुवात केली. शेतामध्ये गहू, कापूस व जनावरांसाठी लागणारा चारा पिके घेऊ लागले. याच उत्पादनाचा आधार घेत दोन मुलींची शिक्षण पूर्ण झाली. एक मुलगी एम. एस्सी. होऊन तिचे लग्न झाले. तर दुसरी मुलगी वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत आहे.
...
मुलींनीही मुलांसारखेच कामे केली
मुलगा नाही याची दोन्ही मुलींनी कधीही आईला जाणीव होऊन दिली नाही. दोन्ही मुलींनी मुलासारखी कामे करून आईला कामात मदत केली. मुलींनी घरदार संसार सांभाळण्यासाठी मोठा वाटा उचलला. परिस्थितीपुढे रडत न बसता आपल्या संसाराबरोबरच मुलींचे ही संसार उभे केले.
..