अहमदनगर : नगर शहरात संचारबंदीचे कडक निर्बंध असतानाही भरदिवसा एका व्यावसायिकाला निर्जन ठिकाणी नेऊन त्याची लुटमार केल्याची घटना समोर आली आहे. १६ मे रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मोबाइल व्यावसायिक नहूश सुनील पडतुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडतुरे यांना १६ मे रोजी दुपारी दीड वाजता एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या फ्लॅटचे थकलेले पंधरा हजार रुपयांचे भाडे तुम्हाला देतो, यासाठी हॉटेल परिचयजवळ या. पडतुरे हे हॉटेलजवळ गेले असता आरोपीने त्यांना शहरातील एसबीआय चौक येथे नेले. तेथे आरोपीचा दुसरा साथीदार उभा होता. घर भाड्याचा चेक देणारे साहेब बुऱ्हाणनगरला आहेत, असे सांगून दोघे आरोपी पडतुरे यांना बुऱ्हाणनगर येथील स्मशानभूमीजवळ घेऊन गेले. तेथे या दोघांनी पडतुरे यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत त्यांच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाइल व पाकीट असा एकूण ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या घटनेनंतर पडतुरे यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद दखल करत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक भारती पुढील तपास करत आहेत.