लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ३० अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाºयांवर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस आदींना मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील. जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांच्या आयोजनास बंदी राहील. मंदिर, मशिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणारी दुकाने/सेवा आस्थापना, उपाहारगृहे/खाद्यगृहे/ खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लर, आॅनलाईन लॉटरी सेंटर आदी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.-----------यांना आदेशातून वगळलेशासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील. परंतु येथेही गर्दी टाळण्याचे आवाहन आहे. दहावी, बारावी, तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाºया सर्व स्पर्धा परीक्षा विद्यापीठ/विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती, प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालिके/टीव्ही न्यूज चॅनेल) कार्यालय चालू राहतील. विद्यार्थ्यांसाठी खानावळ, तसेच महाविद्यालय/वसतिगृह यामधील कॅन्टीन/मेस (केवळ परीक्षार्थी).----------------परदेशी प्रवाशांपासून सावधान आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी अहमदनगर जिल्ह्यामध्येही प्रवास करुन आलेले आहेत व काही प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव परसण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ न होऊ देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.----------तर कारवाईस पात्र कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ आॅफ १९६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ४३ (१) मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद, पोलिसांकडून कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:04 PM