अहमदनगर : महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी नियमांवर बोट ठेवत पाचही अर्ज बाद केले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांची शिफारस मान्य करीत पुन्हा सभा बोलविण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. महापालिकेच्या स्वीकृत पाच नगरसेवकांचे निवडीसाठी मनपा सभागृहात शुक्रवारी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली. प्रभारी आयुक्त राहुल दिवेदी यांनी त्यांच्याकडे दाखल केलेले पाचही अर्ज नियमानुसार अपात्र ठरत आहेत,अशी शिफारस सभागृहात केली. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. नगरसेवकांनी आयुक्तांनी अपात्र ठरविले असले तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार या सभागृहाला आहे, अशी मागणी करीत या पाचही नगरसेवकांच्या या निवडी महापौरांनी जाहीर कराव्यात. तसेच जे कागदपत्र अपुरे आहेत, ते सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी मागणी सदस्यांनी महापौरांकडे केली. यावर सभागृहात बराच वेळ चर्चा झाली. अखेर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्तांनी केलेली अपात्रतेची शिफारस मान्य करून स्वीकृतसाठी पुन्हा सभा बोलविण्यात येईल, असा निर्णय दिला. त्यामुळे स्वीकृतसाठी दाखल झालेले पाचही अर्ज बाद ठरले. ही राज्यातील पहिलीच घटना असावी.स्वीकृतसाठी काही नियम आहेत. त्यातील सहाव्या नियमांमध्ये सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलेले व संबंधित संस्था कोणत्या कार्यक्षेत्रात काम करते. याबाबतचे पुरावे पाचही उमेदवारांनी दिलेले नव्हते. त्यांचे अर्ज अपूर्ण होते. त्यामुळे हे पाचही अर्ज बाद करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिली.
अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकासाठी पाचही अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 5:26 PM