नुकतीच केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ एप्रिलपासून सर्रास कोरोना लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गर्दी वाढणार आहे.
पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र तर थेट पुणे जिल्ह्याच्या सीमेजवळ असणाऱ्या गव्हाणवाडीपर्यंत आहे. गव्हाणवाडी ते पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर २८ किलोमीटर आहे.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन दिवस प्रत्येक दिवशी १०० लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. एवढ्या दूरवरून येऊन त्यात त्या दिवशी त्यांचा नंबर लसीकरणासाठी लागला नाही तर अथवा त्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसच उपलब्ध नसेल तर त्यांना आल्यापावली परत घरी जावे लागणार. त्यामुळे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या गावातील व परिसरातील दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नागरिक लस टोचून घेण्यासाठी उत्सुकता दाखवीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पिंपळगाव पिसा, विसापूर, उखलगाव, चांभुर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, निंबवी, एरंडोली, कोंडेगव्हाण, अरणगाव, ढवळगाव, येवती, हिंगणी, देवदैठण, गव्हाणवाडी ही १५ गावे येतात. या गावांसाठी पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत विसापूर, निंबवी, ढवळगाव व देवदैठण ही चार उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू केल्यास सोईचे व सुलभ होईल. हीच परिस्थिती कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रांत असल्याने तालुक्यातील सर्वच आरोग्य उपकेंद्रांत कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी केली जात आहे. .......
कोरोना लस घेण्यासाठी लोकांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे. लस किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकते त्यानुसार लवकरच सर्व उपकेंद्रांत लसीकरण चालू करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ. नितीन खामकर, तालुका आरोग्याधिकारी, श्रीगोंदा
फोटो - ३० विसापूर
- पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी सध्या होणारी गर्दी.