पारनेर : कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदारांना राजीनामा देण्याचा अधिकार पक्षप्रमुख यांना विचारून घ्यावा लागतो. मराठा आरक्षण प्रशावर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन सर्वांना राजीनामा देण्यास सांगितल्यावर राजीनामा देण्याची भूमिका पारनेर तालुक्याचे शिवसेना आमदार विजय औटी यांनी मांडली. मराठा आरक्षणासाठी सेना सुरुवातीपासून आग्रही असल्याचे औटी यांनी सांगितले.सकल मराठा समाजाच्या वतीने पारनेर शहरात सकाळी पारनेर बसस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकत्यांनी राज्यात काही आमदारांनी राजीनामे दिले असल्याने आमदार विजय औटी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सभेत केली. यावेळी कार्यकर्त्यांनी थेट आमदार विजय औटी यांचे संपर्क कार्यालय गाठले. सेनेचे शहरप्रमुख निलेश खोडदे यांनी सेनेची भूमिका मराठा आरक्षण बाजूने असल्याचे सांगितले. आमदार विजय औटी यांनी कार्यकर्त्यांसमोर येऊन भुमिका मांडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याचेही औटी यांनी सांगितले.
पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर सेनेच सर्व आमदार राजीनामा देतील : आ.विजय औटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:27 PM