अहमदनगर : शहरातील तोफखाना परिसरातील अकरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सर्वधर्मिय समाजाने विराट मोर्चा काढून आरोपीला फाशीची मागणी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.तोफखाना परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर त्याच भागातील विवाहीत २४ वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ गांधी मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. दुपारी दीडच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करावे, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, कोणत्याही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित मुलीच्या कुटुंबियांना तातडीने २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी, पीडितेला वैद्यकीय, तसेच पुढील सर्व शैक्षणिक मदत मिळावी व तिला सरकारी नोकरीची ग्वाही सरकारने द्यावी, निर्भया कन्या योजना त्वरित लागू करावी, पीडितेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, आदी मागण्या मोर्चावेळी करण्यात आल्या. यावेळी मोर्चातील तीन मुलींनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
अत्याचाराच्या निषेधार्थ नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वधर्मिय मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:45 PM