संगमनेर : हॉटस्पॉट कालावधी संपल्यानंतर देखील पुढील आठवडाभर शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली होती. या भूमिकेस व्यापारी संघटनांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात २४ ते २६ मे पर्यंत सर्व दुकाने, आस्थापन बंद राहतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. डॉ. मंगरूळे म्हणाले, शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे २३ मे पर्यंत येथे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. हा कालावधी संपल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून गर्दी करतील. त्यामुळे फिजीकल डिस्टन्सिगचे पालन होवू शकणार नाही. रमजान ईदनिमित्त शहरातील दुकाने उघडली तर दोन महिने घरात असलेले सर्वच समाजाचे लोक बाहेर पडून गर्दी करतील. यंदा मुस्लिम बांधव साधेपणाने घरातच रमजान ईद साजरी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट संपल्यानंतर पुढील आठवडाभर सर्वच दुकाने बंद ठेवावेत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. या भूमिकेस व्यापारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शहरात २६ मे पर्यंत सर्व दुकाने, आस्थापन बंद राहतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने घेतलेल्या समजदारी व सामंजस्याच्या भूमिकेचे प्रशासनाने स्वागत केले आहे, असेही डॉ. मंगरूळे म्हणाले.
संगमनेर शहरात २६ मे पर्यंत सर्व दुकाने बंद राहणार; व्यापारी संघटनांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:34 AM