अहमदनगर : मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांसाठी २०० लोकांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळावी, अशी मगाणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रक़ांत फुलारी, अजिंक्य पवार, राजेंद्र उदागे, जालिंदर कोतकर, जयंत जाधव, संजय जाधव, अभिमन्यू नय्यर, अमित मुथा, प्रमोद लगड, रमाकांत गाडे उपस्थित होते.
शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्जामुळे मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोविडचे संकट दूर होत असताना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय, हॉल चालक यांच्यावर शासनाचे नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व सदस्य शासनाचे सर्व नियम पालन करुन ५० ऐवजी २०० लोकांना कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी.
भगवान फुलसौंदर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे मान्य असले तरी नियमांचे पालन करुन अनेक व्यवसाय सुरु आहेत. त्याच धर्तीवर मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांना २०० लोकांची परवानगी मिळावी. कोणत्याही धार्मिक, लग्न, कौटूंबिक कार्यक्रमासाठी घरातीलच १०० लोक असतात. जवळचे नातेवाईक त्याच बरोबर सजावटकार, आचारी, केटरर्स, फोटोग्राफर, बॅण्ड-स्पिकर, भटजी आदींचा विचार केल्यास ही संख्या किमान २०० पर्यंत जाते. त्यामुळे या परवानगीची मागणी केली आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमांवर अवलंबून असणारे अनेक कुटूंबिय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता पुन्हा काही दिवस ही परिस्थिती राहिली तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, त्याचबरोबर मालकांवरही कर्जाचा बोजा आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी अहमदनगर जिल्हा हॉटेल, परमिट रुम असोसिएशनच्यावतीनेही जिल्हाध्यक्ष हेमंत जाधव यांनीही नियमात शिथिलता देण्यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी सचिव डॉ.अविनाश मोरे, अनिल बोराटे, प्रशांत बोरुडे, अनिल ससाणे, अर्जुन बोरुडे आदि उपस्थित होते.