लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : शहरात रिक्षा थांब्यांवर रिक्षा उभ्या दिसतात. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांची संख्या फारच कमी झाल्याने भाड्यासाठी रिक्षाचालकांना तासनतास वाट पाहावी लागते. दिवसभर थांबून शंभर रुपयेसुद्धा मिळत नाहीत. कोरोनाबरोबरच पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटकाही रिक्षाचालकांना बसला असून ते आर्थिक विवंचनेत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, मुला-मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे, यासह अनेक प्रश्न संगमनेरातील रिक्षाचालकांना पडले आहेत.
संगमनेरात शेकडो रिक्षा आहेत. घुलेवाडी, संगमनेर बसस्थानक, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर, सह्याद्री महाविद्यालय, जोर्वे नाका, नेहरू चौक, नवीन नगर रस्ता या प्रमुख रिक्षा थांब्यासह इतरही काही चौकांमध्ये रिक्षा उभ्या असतात. कोरोना पूर्वी रस्त्यांवर अनेक रिक्षा धावताना दिसायचा. मात्र, आता बोटांवर मोजता येतील इतक्याच रिक्षा रस्त्यांवर धावताना दिसतात. शाळा, महाविद्यालये सुरू होती, तेव्हा सकाळी दहापर्यंत दोन ट्रिप तरी सहज व्हायच्या. आता दिवसातून एक ट्रिप होणे मुश्कील झाल्याचे घुलेवाडी स्टाॅपवर उभ्या असलेल्या रिक्षाचालकांनी सांगितले.
कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. संगमनेर बसस्थानकात बसेस कमी येतात. ग्रामीण बसेसच्या फेऱ्याही बंद आहेत. त्यांचाही परिणाम जाणवतो आहे. पूर्वी २४ तास बसेस सुरू असायच्या. त्यामुळे रात्रीही भाडे भेटायचे. मात्र, आता दिवसाही भाड्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते, असे संगमनेर बस स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले.
पहिला लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी बचतीचे पाच-दहा हजार रुपये जवळ होते. ते घरखर्चाला, दवाखान्यात उपचारांसाठी खर्च झाले. त्यानंतर हातउसने पैसे घेतले. बँकांमधून तातडीचे कर्ज काढले. फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. कोरोनाची पहिली लाट संपली. आता सर्वकाही सुरळीत होईल, असे वाटत असताना दुसऱ्या लाटेत भयंकर हाल झाले. आमच्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारांसाठी पैसे नव्हते. मुला-मुलींचे शिक्षण ऑनलाईन असल्याने तो खर्च आता वाढला आहे. त्यांच्या शाळेची फी भरणे बाकी आहे. कर्जाचे हप्ते, वीजबिल थकले. उदरनिर्वाहासाठी, दवाखान्याला पैसे खर्च होतात. अशातच रिक्षाचे काही काम निघाल्यास पैसा लागतो. एकूण खर्चाच्या तुलनेत आवक मात्र फारच कमी आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने कुठलाच ताळमेळ सध्या बसत नाही. अशा अनेक व्यथा संगमनेरातील रिक्षा चालकांनी मांडल्या.
----------------
कोरोनाच्या काळात रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. तसेच भाडेही अधिक आकारले जात असताना आमच्या संगमनेरातील सर्वच रिक्षाचालकांनी अल्पशा भाड्यात रुग्णांना दवाखान्यात नेले. पैशाअभावी कोणाचीही अडवणूक केली नाही, आणि भविष्यात कधीच करणार नाही. मात्र, आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. शासनाने जाहीर केलेली दीड हजार रुपयांची मदत देखील अनेकांना मिळालेली नाही.
-मोरेश्वर परदेशी, अध्यक्ष, राजहंस रिक्षा चालक-मालक संघ, संगमनेर
--------
कोरोनामुळे दोन-तीन रिक्षाचालकांचे निधन झाले. कोराेना उपचारांसाठी अनेकांकडे पैसे नव्हते. कुठून तरी कसा तरी पैसा उपलब्ध केला. मात्र, आता परिस्थिती अजूनही बिकट बनली आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याने पूर्वीसारखे पैसे आता भेटत नाहीत. कर्जाचा डोंगर वाढला आहे.
-अभिजीत निऱ्हाळी, उपाध्यक्ष, शिवछत्रपती रिक्षा चालक-मालक संघटना, संगमनेर
---------------------
STAR 1201