अहमदनगर : जिल्ह्यातील धरणे तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता जिल्ह्यातील संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करून सादर करा. तसेच टँकर खाली करण्यासाठी गावागावात ५ हजार लीटरच्या टाक्या उपलब्ध करून द्या, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री विखे-पाटील बोलत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार लहू कानडे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते उपस्थित होते, तर सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले की, संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये याची खबरदारी घेत जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, वस्त्यांमध्ये पाणी मिळेल यादृष्टीने पाणी पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा. पाणी पुरवठ्यासाठी पाणी उद्भवाचा सर्व्हे करून ते निश्चित करण्यात यावेत. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गतीने राबवून ती अंतिम करण्यात यावी. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या ठिकाणी पाच हजार लीटरच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल यादृष्टीने चाऱ्याचेही नियोजन करण्यात यावे.
जिल्ह्यात मागेल त्याला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेमध्ये सेल्फवर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून ठेवण्यात यावीत. संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीत पाणी पुरवठा योजनांची वीजजोडणी खंडित करण्यात येऊ नये, अशा सूचनाही पालकमंत्री विखे-पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने उपयुक्त सूचना केल्या. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.अभियंत्याच्या निलंबनाची मागणीआमदार राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठकीमध्ये सीना धरणातून आवर्तन सोडण्याच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जयंत देशमुख हे सीना धरणाचे आवर्तन सोडण्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. आ. शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सीना धरणात मुबलक पाणी असल्याने तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री विखे यांनी आजच पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले.