-मुकुंद महाराज जाटदेवळेकर / स्वत:ला तिळाएवढे लहान समजा. नम्र व्हा. निष्कलंक चारित्र्यसंपन्न जीवन जगा. यामुळे देव आपल्या जवळ निश्चित येईल. देव तिळी आला म्हणजे तिळाएवढा देव आपल्या शरिरात असतो. तो आपल्या आत्म्यात विराजमान असतो. अंतरी ध्यान लावून त्याच्याशी संवाद केला तर जो आनंद मिळतो तो आनंदच देव तिळी आल्याची अनुभूती मिळवून देतो. आपण जेव्हा सर्व ठिकाणी देव पहातो, तेव्हा आपणच देव होतो. अंत:करणरूपी मोबाईलमधून मीपणा डिलीट केला की अंगी नम्रता येते. आपण तीळ झालो म्हणजे देव हृदयात येतो. देवाशी संवाद करण्याची गोडी लागली की ती वाढतच जाते. इंद्रिय व मनातील वासना शांत होणे हे चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. संक्रांतीसारख्या पर्वकाळात केलेली साधना सिध्द होते. दिलेले दान अनंतपटीचा लाभ मिळवून देते. दान केल्याने पुण्य लाभते. हे पुण्य अनेक काळपर्यत सुख प्रदान करते. पर्वकाळात परिवार आणि परिसर विसरून देवासमोर एकांतात बसावे. परमेश्वराशी अनुसंधान ठेवावे. पर्वकाळात परमेश्वराचे नामस्मरण, उपासना, तपश्चर्या करावी. पर्वकाळात केलेली साधना इतर काळाच्या अनंतपटीने भगवंतापर्यत पोहोचते. साधना व्यवस्थित चालली तर आयुष्य घालवून जे मिळत नाही ते सहज मिळते. श्रीसमर्थांनी साधना व तपश्चर्या केल्यानंतर कोणत्याही सुविधा नसलेल्या काळात बलसंपन्नतेचा संदेश देत श्रीमारूतीरायांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या. ठिकठिकाणी मठस्थापना करून महंत निर्माण केले. तिर्थाटन करताना भिक्षेच्या निमित्ताने जनजागरण केले. आज गावोगावी दिसणारी श्रीमारूतीरायांची मंदिरे ही श्रीसमर्थ रामदास स्वामींची विचारधारा सर्वदूर पोहोचल्याची स्मृतीच जागवत आहेत. आपला गर्वकाळ विनाशाकडे नेतो. त्यासाठी पर्वकाळ केव्हा येतो? याची वाट न पहाता सर्वकाळ सत्कार्यात घालवावा. आपल्या भारतभूमीतील संतांच्या वाणीमधून प्रसवलेले ग्रंथ हे त्यांचे रूपच आहेत. सांसारिक साधकांच्या हाती ग्रंथ देऊन संतांनी जीवनयात्रा सफल होवो, असा आशिर्वाद दिला आहे.
सर्वकाळ सत्कार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:57 PM