साहेबराव नरसाळेराज्य नाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नगर केंद्रावर ‘मुंबई मान्सून’ हे महेंद्र तेरेदेसाई लिखित व शैलेश देशमुख दिग्दर्शित नाटक सादर झाले. फक्त तीन पात्र असलेले हे नाटक पुढे नेण्याचे मोठे आव्हान दिग्दर्शकासमोर होते. उत्तम संवादफेक आणि उचल, उत्तम नेपथ्य, उत्तम प्रकाशव्यवस्था, संगीतही साजेसे असे सारे जुळून आलेले असतानाही एका लयीत नाटक पुढे नेण्याचे दिग्दर्शनिय कौशल्य कमी पडल्याचे हे नाटक पाहताना जाणवते़ नाटकातील ओमची भूमिका संकेत शहा, वैदेहीची भूमिका जान्हवी जोशी तर अद्वैतची भूमिका शैलेश देशमुख यांनी साकारली आहे़‘ओ साथी रे तेरे बिना भी क्या जिना़़़’ या गाण्याच्या गोड स्वरांनी ‘मुंबई मान्सून’चा पडदा उघडतो़ स्वयंपाक गृहात ओम चहा करताना दिसतो़ त्याचवेळी अद्वैत फे्रश होऊन हॉलमध्ये येतो़ ओम कुठल्याशा विचारात हरवलेला असतो़ अद्वैत गाणे बंद करतो आणि ओमला बे्रकअपमधून बाहेर पडण्याचा सल्ला देतो़ एव्हाना ओम आणि अद्वैत या बापलेक असल्याचे स्पष्ट होते़ त्यांच्यातील सुसंवाद मैत्रीच्याही पलिकडचा असतो़ आई सोडून गेल्यामुळे बापानेच ओमचा सांभाळ केलेला असतो़ अद्वैतने ओमचा मित्र, आई आणि बाप अशा सगळ्या भूमिका पार पाडत ओमला लहानाचे मोठे केलेले असते़ हे त्यांच्या संवादातून प्रेक्षकांना समजते़ त्यांचा संवादही एकदम मोकळा, प्रवाही असल्यामुळे पहिल्या प्रवेशातच प्रेक्षकांना नाटकात गुंतविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो़ पहिला प्रवेश छोटा़ तो लवकरच संपतो़ दुसरा प्रवेश सुरु होतो़ त्यावेळी रंगमंचावर एकटा ओम असतो़ तो फोनवरुन वैदेहीशी बोलत असतो़ त्याचवेळी त्याचा बाप म्हणजे अद्वैत येतो़ येथे अद्वैतची एन्ट्री चुकते़ पहिल्या प्रसंगात तो फे्रश होऊन ज्या बेडरुमच्या दरवाजातून आत आला, त्याच दरवाजाने तो पुन्हा आत येतो़ पण यावेळी तो बेडरुममधून नव्हे तर बाहेरुन दारुची बाटली घेऊन आलेला असतो़ अद्वैतचा हा प्रवेश खटकत राहातो़ पुढे त्यांच्यातील संवाद तसाच कधी भुतकाळ तर कधी वर्तमानकाळात रेंगाळत राहतो़ दुसरा प्रवेश खूपच लांबलचक वाटायला लागतो़ हा प्रवेश संपत येतो, तेंव्हा या नाटकातील तिसरे पात्र वैदेहीची एन्ट्री होते़ वैदेही ही ओमची मैत्रिण़ ओम आपल्या वडिलांसोबत म्हणजे अद्वैतसोबत तिची ओळख करुन देतो अन् दुसरा प्रवेश तेथे संपतो़ फेडआऊट होतो़ काही सेकंदात ओम आणि वैदेही ड्रेस चेंज करुन रंगमंचावर असतात़ प्रेक्षक दोघांनाही टाळ्या वाजवून दाद देतात़ पण पुढे त्यांच्यात सुरु होणारा संवाद श्रवणीय जरी असला तरी प्रेक्षणीय ठरत नाही़ पुन्हा तेच भुतकाळात गुंतणे आणि वर्तमानात रेंगाळणे सुरु होते़ नाटकात फारसे काही घडतच नाही़ त्यामुळे केवळ कलाकारांचा संवाद, त्यातून होणारे त्रोटक विनोद पचवण्याशिवाय प्रेक्षकांना पर्याय उरत नाही़ नाटकात घटना असतील तर नाटकात गती टिकून राहते़ प्रेक्षक गुंतून राहतो़ किंवा ते पूर्ण विनोदी असायला हवे़ तरुण पिढीतील पे्रम आणि शारीरिक आकर्षण यातील वैचारिक गोंधळावर भाष्य करताना लेखकाने इतरही अनेक विचार नाटकातून प्रस्तूत केले़ त्यामुळे नक्की नाटक आपल्याला काय सुचवू पाहत आहे, हे प्रेक्षकांना समजण्यास थोडे जड जाते़‘लव्ह ट्रायअँगल’ ही एकांकिका किंवा ‘तुला पाहते रे’ या मालिकेची आठवण करुन देणारे हे नाटक़ पण यात घटना म्हटल्या तर फार काही घडतच नाहीत़ त्यामुळे केवळ संवाद आणि अभिनयाच्या बळावर हे नाटक शेवटाकडे ढकलावे लागते़अद्वैतची भूमिका करताना शैलेश देशमुख आणि ओमची भूमिका करताना संकेत शहा दोघेही भूमिकांशी समरुप झाले़ त्यांच्यातील संवादफेक आणि उचल तर लाजवाबच़ वैदेही अद्वैतला प्रपोज करतानाच्या दृश्यामध्ये शैलेशने तिच्याकडे फिरवलेली पाठ असेल किंवा ओम वैदेहीवर प्रेम करायला लागला आहे, हे जेंव्हा ओम अद्वैतला सांगतो, त्या प्रसंगातील दोघांनी एकमेकांकडे केलेली पाठ आणि त्यावर पडलेला प्रकाशझोत व्यावसायिक नाटकांपेक्षा कितीतरी सरसच होता़ वैदेहीच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न जान्हवी जोशी यांनी केला़ मात्र, संकेत शहा आणि शैलेश देशमुखच्या सहज अभिनयापुढे जान्हवीचा अभिनय झाकोळला गेला़ काही प्रसंगात तिच्यातील कृत्रीमपणा जाणवत होता़प्रकाश योजना, नेपथ्य हे या नाटकाच्या जमेच्या बाजू़ ओमच्या अपघातानंतर त्याला दवाखान्यातून घरी आणण्यात येते़ त्यानंतर वापरलेल्या मोंताजमध्ये प्रकाश योजना उत्तम झाली खरी, पण पुढच्या प्रसंगात प्रकाश योजनेत थोड्या चुका झाल्या़ इतर ठिकाणी प्रकाश योजना चांगली झाली़ नेपथ्य कसे नेटके आणि पूर्ण वापरात येईल असेच असावे याचा पाठ या नाटकात पहायला मिळतो़ डायनिंग टेबल, दारुच्या बाटल्यांनी भरलेले कपाट, त्याच्या शेजारीच असलेले पुस्तकांचे कपाट, टेप रेकॉर्डर, सोफासेट, किचन, गॅलरी, गिटार, गॅलरीतील स्टॅच्यू आणि झाडेसुद्धा, अशा सर्वांचा वापर कलाकारांनी केला़ त्यामुळे उगाच काहीतरी स्टेजवर मांडायचे म्हणून मांडलेय असे काही जाणवलेच नाही़ ती कथेची गरज होती, असेच त्यातून प्रतित होते़ म्हणूनच नेपथ्यकार अंजना मोरे यांचे कौशल्य त्यातून दिसून येते़ सोहम सैंदाणे यांनी रंगभूषा व शीतल देशमुख यांनी वेशभूषा नेटकी केली़कलाकार भूमिकासंकेत शहा ....... ओमजान्हवी जोशी ..... वैदेहीशैलेश देशमुख ..... अद्वैततंत्रज्ञशैलेश देशमुख - दिग्दर्शकवसी खान - पार्श्वसंगीतअंजना मोरे - नेपथ्यगणेश लिमकर - प्रकाशयोजनासोहम सैंदाणे - रंगभूषाशीतल देशमुख - वेशभूषा
आजचे नाटक- तीस तेरा