पारनेर : पारनेर पोलीस ठाण्याच्या तुरूंगात असलेला कुरूंद येथील अमोल कर्डिले पळून गेल्यानंतर आता त्याच्यासह पोलिसांबरोबर असलेल्या पारनेरमधील चार ते पाच मित्रांना सुपा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नगर न्यायालयातून पोलीस अमोलसह थेट गव्हाणवाडी येथेच गेल्याचे जबाब काही प्रत्यक्षदर्शींनी दिल्याची माहिती पुढे आले आहे. यामुळे या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे.पारनेर पोलीस ठाण्यात विविध हाणामाऱ्या व इतर गुन्हे प्रकरणी अमोल भाऊसाहेब कर्डिले याला २५ एप्रिल रोजी पारनेरचे पोलीस कुंडलिक आरवडे व रवींंद्र कुलकर्णी यांनी नगरच्या न्यायालयात नेले. तेथून येताना सुपा येथे लघुशंकेसाठी उतरलेला कर्डिले पोलीस कुलकर्णी यांच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेल्याची फिर्याद पोलीस आरवडे यांनी सुपा पोलीस ठाण्यात पहाटे ३.४५ वाजता दिली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दोघा पोलिसांना निलंबितही केले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने गुरूवारी पोलीस आरवडे व कुलकर्णी व अमोल कर्डिले यांच्या एकत्रित चित्रफितीचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हा पोलिसांमध्ये खळबळ उडाली. अमोल पळून गेल्याची पोलिसांची फिर्यादच संशयाच्या भोवऱ्यात आहे. पारनेरमधील चौकशीसाठी ताब्यात घेतलेले चार ते पाच युवक कर्डिले याची पाठराखण करीत होते की त्यांचाही घटनेत सहभाग आहे का? याची चौकशी सुपा पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आता पोलीस कुंडलिक आरवडे व रवींद्र कुलकर्णी यांचीही चौकशी होणार असून त्यांनी अमोल कर्डिलेला पळून जाण्यास मदत केली की अमोल खरोखरच पळाला याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणाने पोलीस दलाची नाचक्की होत आहे. या दोन पोलिसांची कोणतीही गय केली जाणार नसल्याची भूमिका पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी घेतली आहे. नगर येथील न्यायालयातून पारनेरचे पोलीस कुंडलिक आरवडे, रवींद्र कुलकर्णी यांनी आरोपी अमोल कर्डिले याला घेऊन मध्ये कुठेही न थांबता थेट गव्हाणवाडी गाठले. फक्त न्यालालयाच्या आवारात त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर गव्हाणवाडी येईपर्यंत तो मोकळाच होता, अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे समजते. यामुळे पोलिसांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमोल कर्डिलेच्या मित्रांना घेतले ताब्यात
By admin | Published: April 28, 2016 10:57 PM