अहमदनगर : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत अहमदनगर महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल महापौरांसह आयुक्तांना ५ कोटींचे पारितोषिक देऊन गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत गौरविण्यात आले.
नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून निवड केली. या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागांतील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता. याकरिता महानगरपालिकेने राबवलेले विविध उपक्रम निर्णायक ठरले व महापालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
गुरूवारी मुंबईत नगर विकास दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा बोरुडे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पाच कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.