अहमदनगर : शासकीय योजना पूर्ण होईपर्यंत एकाच अधिकाऱ्याकडे असते. महापालिकेने मात्र गेल्या तीन वर्षात तीन अधिकारी बदलले असून, अमृत भुयारी गटार योजनेची जबाबदारी आता शहर अभियंता सुरेश इथापे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महापालिकेची अमृत भुयारी गटार योजना पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित होती. तत्कालीन पाणीपुरवठा विभागप्रमुख महादेव काकडे यांच्याकडे सदर योजनेची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. ते सेवानिवृत्त झाल्याने पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांच्याकडे ही योजना सोपविण्यात आली. त्यांच्याकडून ही योजना आयुक्त शंकर गोरे यांनी काढून घेतली असून, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्याकडे सोपविली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने योजनेचे काम थांबविण्यात आले आहे. हे काम ड्रिम कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. सदर संस्थेने मध्यवर्ती शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाइप टाकले. परंतु, रस्ते पुन्हा दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे शहरातील ४०हून अधिक रस्त्यांची कामे रखडली असून, रस्त्यांची तात्पुरती दुरुस्तीही ठेकेदाराकडून केली नाही. पावसाळा सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने वेळोवेळी बजावूनही ठेकेदाराने रस्ते दुरुस्त केली नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ही योजना आता बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे.
.......
आयुक्त म्हणतात काम थांबविले
अमृत भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. याबाबत नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठविला होता. त्यावर आयुक्त शंकर गोरे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, कारवाई न करता ठेकेदाराचे काम पावसाळा सुरू असल्याने थांबविले आहे, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले. परंतु, गेल्या सहा महिन्यांत खोदलेल्या रस्त्यांचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.