संगमनेर : सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या सॅन्ट्रो कारला इन्होवा कारची धडक बसली. या अपघातात सॅन्ट्रो कारमधील दोघे जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे हा अपघात घडला. या प्रकरणी गुरुवारी इन्होवा कारचालकाविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अक्षय उत्तम सोनवणे (वय २५, रा. मनेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या इन्होवा कार चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात प्रतीक नारायण भोसले (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक ४०४, अबोली बिल्डिंग, आंबेगाव फाटा, कात्रज, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रतीक भोसले हे सॅन्ट्रो कारने पुणे येथून त्यांच्या कुटुंबियांसमवेत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघाले होते. सायखिंडी फाटा येथे गतिरोधकाजवळ इन्होवा कारचालक सोनवणे याच्या ताब्यातील कारची भोसले कुटुंबीय प्रवास करील असलेल्या सॅन्ट्रो कारला जोराची धडक बसली. यात भोसले आणि त्यांची आई असे दोघे जखमी झाले. इन्होवा कारचालक सोनवणे हा दारू पिऊन भरधाव कार चालवित होता. या अपघात सॅन्ट्रो कार (एम. एच. १२, एफ.के. ८७४६) आणि इन्होवा कार (एम.एच.१९, ए.डी. ९७९९) या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलिस नाईक ज्योती नानासाहेब दहातोंडे अधिक तपास करीत आहेत.