योगेश गुंड -केडगाव (अहमदनगर) : नगर तालुक्यातील कामरगावामध्ये औरंगजेबाचे नाव असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला आहे. हा शिलालेख गावातील एका विहिरीच्या तळाशी बसविण्यात आला आहे. औरंगजेबाचे नाव असलेले फारसी लिपीतील शिलालेख आढळतात. मात्र, देवनागरी लिपीतील बहुधा हा पहिलाच शिलालेख असावा, असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले. या शिलालेखाचे वाचन कामरगावमधीलच इतिहास अभ्यासक सतीश भीमराव सोनवणे यांनी केले आहे.
संबंधित शिलालेख हा छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे. या शिलालेखात म्हटले आहे की, शक संवताच्या १६१४ व्या वर्षात अंगिरा संवत्सरात वैशाख शुद्ध तृतीयेला शनिवारी औरंगजेब आलमगीरच्या कामरगावातील रहिवासी अब्दुल सलाम ऊर्फ साउजी बापूजी यांनी २५१ रुपये खर्च करून विहीर सयाजी पाटील प्रतापजीने बांधली. पिले जंत्रीनुसार शिलालेखाची इंग्रजी तारीख ९ एप्रिल १६९२ अशी येते. म्हणजे ही विहीर तब्बल ३३२ वर्षे एवढी जुनी आहे.
पाच ओळींच्या शिलालेखाला ऐतिहासिक संदर्भपाच ओळींच्या या शिलालेखाची लिपी देवनागरी असली तरी काही अक्षरे मोडी वळणाची आहेत. शिलालेख खोदीव स्वरूपाचा आहे. यात बाशिंदा हा फारसी शब्द आलेला आहे. ज्याचा अर्थ रहिवासी होतो. औरंगजेबाचे मूळ नाव मुहिउद्दीन मोहम्मद होते. त्याचा संक्षेप मु. मो. असा कोरलेला दिसतो. १६८१ मध्ये औरंगजेब दख्खनच्या स्वारीवर आला. त्याच्या आयुष्याची शेवटची २६ वर्षे त्याने इथेच घालवली. परंतु, त्याचा निभाव लागला नाही.
औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याची पाच लाखांची सैन्य छावणी नगरजवळ होती. शिलालेखात उल्लेख असलेले आंधळे घराण्यातील साउजी बापूजी हे त्यावेळी कामरगावचे पाटील होते. त्यांनी १६९२ मध्ये गावात एक पाय विहीर बांधली. विहिरीवरील शिलालेख हे सामान्यपणे कमानीवर किंवा विहिरीच्या वरच्या भागात असतात. हा शिलालेख मात्र तळाशी आहे हे आणखी एक वेगळेपण.