जागतिक पर्यटन दिन विशेष/ बाळासाहेब काकडे / श्रीगोंदा : अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आकर्षण असलेली श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा व समाधी स्थळे दुर्लक्षित झाली आहेत. यामध्ये महादजी शिंदे यांच्या वाड्याजवळ असलेले सूर्य मंदिर नामशेष झाले आहे. सरस्वती नदी काठावरील पुरातन ठेवाच नष्ट होतो की काय, अशी स्थिती आहे. महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची गाथा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक संत शेख महमंद महाराज यांच्यामुळे श्रीगोंदा नगरीची ऐतिहासिक, आध्यात्मिक यशोगाथा गुगलवर गेली. त्यामुळे देशी-परदेशी पर्यटकांना हा ठेवा खुणावत आहे. मात्र संत शेख महंमद महाराज मंदिराचा विकास वादात रेंगाळत पडला आहे. अष्टविनायकांची आठ मंदिरे, अष्टभैरवची आठ मंदिरे, नवचंडीकामातेची नऊ मंदिरे, मारूतीची अकरा मंदिरे, संत राऊळबुबा, संत प्रल्हाद महाराज, संत रोहिदास, संत गोधड महाराज, तसेच लक्ष्मी पांडुरंग, लक्ष्मी नारायण, शनी मारुतीची मंदिर येथे आहेत. महादजी शिंदे यांचा सात मजली वाडा असून, त्यातील तीन मजले शिल्लक राहिले आहेत. शिंदे घराण्यातील समाधीस्थळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहेत. शहराला चार वेशी होत्या. त्यातील आता केवळ उत्तर व पूर्वमुखी अशा दोनच वेशी राहिल्या आहेत. त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. श्रीगोंदा शहराची दक्षिण काशी अशी ओळख आहे. राजकीय, सामाजिक रेट्यातून या पुरातन ठेव्याला पुन्हा झळाळी मिळू शकते. तसेच झाले तर निश्चितच श्रीगोंदा शहर वाराणशीप्रमाणे जगाच्या नकाशावर लक्षवेधी ठरेल. त्यातून श्रीगोंदा नगरीच्या विकासाला चालना मिळेल.
श्रीगोंद्यातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा दुर्लक्षीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 4:56 PM