केडगाव : मूळचे पिंपळगाव कौडा (ता.नगर) येथील असणारे कुंटुब बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्याचे आॅनलाईन वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’मधूून झळकले. गावात तणावाचे वातावरण तयार झाले. मात्र हे कुंटुब गावात आलेच नसल्याची खात्री झाल्याने गावक-यांचा जीव भांड्यात पडला आहे.नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील मूळ रहिवासी असणारे कुंटुब मुंबईहून आपले नातेवाईक असणारे आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे गेले. मात्र तेथे गेल्यानंतर त्यांना लक्षणे दिसू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात हे कुटुंब कोरोनाबाधित असल्याचे वृत प्रथम ‘लोकमत’मध्ये आॅनलाईन झळकले. याची चर्चा होताच गाव खडबडून जागे झाले. सरपंच सतीश ढवळे, ग्राम समितीने तत्काळ त्या कुटुंबाची माहिती मिळविण्यासाठी गावातील त्या कुटुंबियांच्या जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. या चौकशीत हे कुटुंब गावात आलेच नाही. ते थेट मुंबईहून आष्टी तालुक्यातील आपल्या नातेवाईकाच्या गावी गेल्याची माहिती ग्राम समितीला मिळाली. यामुळे गावक-यांचा जीव भांड्यात पडला. असे असले तरी या घटनेने ग्रामस्थ खडबडून जागे झाले आहेत.गावात याआधीच ४ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामसमिती बाहेरून आलेल्यांवर बारकाईने नजर ठेवत आहे. सोमवारी (दि.८ मे) सकाळी पिंपळगाव कौडाची बातमी ‘लोकमत’मध्ये आल्यानंतर ग्राम समितीने तातडीची बैठक घेतली. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली.
पिंपळगाव कौडाचे वृत्त गावात धडकताच गाव काळजीत पडले. मात्र हे कुंटुब गावात आलेच नाही. तरीही आम्ही बाहेरून आलेल्यांवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. याबाबत ग्रामसुरक्षा समिती आणखी सजग करण्यात आली आहे. गावात कोणीही संशयास्पद रूग्ण नाही, असे पिंपळगाव कौडाचे सरपंच सतीश ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.