राहाता : अंगणवाडी सेविकांना मानधन नको तर वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी राहाता तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व कॉम्रेड राजेंद्र बावके यांनी केले.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचा-यांना मानसेवी म्हणून संबोधले जाते. कामगार म्हणून त्यांना किमान वेतन मिळणे अपेक्षित असताना ते मिळत नाही. भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्य विमा आदी सामाजिक सुरक्षांचे लाभ दिले जात नाही. इंडियन लेबर कॉन्फरन्सच्या बैठकीत अंगणवाडी कमार्चा-यांना मानसेवी न समजता त्यांना कामगार म्हणून मान्यता द्यावी, किमान वेतन द्यावे व सार्वजिनक सुरक्षा लाभ द्यावे अशी शिफारस केली आहे़ या शिफारसी लागू कराव्यात, अशी मागणी करीत अंगणवाडी सेविकांनी हा मोर्चा काढला. नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची देशाला नितांत गरज आहे. या योजनेस बळकटी देण्याऐवजी मोदी सरकारची पावले योजना कमकुवत करण्याच्या दिशने पडत असल्याचा आरोप बावके यांनी केला. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बजेटमध्ये कपात केल्यामुळे लाभार्थिंना योग्य आहार, कर्मचा-यांना मिळणारे तुटपुंजे मानधन मिळणे बंद झाले. येत्या बजेटमध्ये भरीव तरतूद करावी. अंगणवाडीतील मुलांना, गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा आहे. पाच रुपयांत पुरक पोषक आहार देणे शक्य नसल्याने या रकमेत वाढ करावी, आदी मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या.
राहाता तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:00 PM