श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे पोटासाठी अंगणवाडी सेविकांना शेतात रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली असून, मानधन मिळावे, यासाठी अंगणवाडी सेविकांनी सोमवारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षा नंदाबाई पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी अलका शिरसाठ व प्रकल्प अधिकारी शैला खामकर यांना निवेदन देण्यात आले. अंगणवाडी सेविकांशी चर्चा करताना अलका शिरसाठ म्हणाल्या, शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने जमा करण्यास सुरूवात केली आहे. आॅनलाईन पद्धतीने मानधन जमा करण्यात काही अडचणी आल्या आहेत. आठ दिवसात सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन बँकेत जमा होईल़ तसेच इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प अधिकारी शैला खामकर यांनी युनियन पदाधिका-यांबरोबर बैठक घ्यावी.नंदाबाई पाचपुते म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तीन महिन्यापासून मानधन नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काही अंगणवाडी सेविका कांदा लावण्यासाठी जात आहेत. आता मानधन जमा न झाल्यास प्रकल्प कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी संगीता इंगळे, मनिषा माने, रजनी क्षीरसागर, छाया भागवत, वैष्णवी ढवळे, सुमन पाचपुते, सुनंदा पडवळ, चंद्रकला सुपेकर, स्वाती भंडारी, मीना जायकर आदी उपस्थित होत्या.
मानधनाअभावी अंगणवाडी सेविकांवर आली शेतात रोजंदारी करण्याची वेळ; मानधनासाठी श्रीगोंद्यात काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:08 PM