अहमदनगर: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटिसा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युटी आदी प्रलंबीत प्रश्नांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सरकारला जागे करण्यासाठी शिट्ट्या वाजवून निषेध नोंदविला. संपाचा ३५वा दिवस उघडून देखील मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. मानधन नको वेतन हवे..., वेठबिगारी नको जगण्याचा हक्क हवा... या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, सहचिटणीस कॉ. जीवन सुरूडे, कॉ. शरद संसारे, सिध्दार्थ प्रभुणे, माया जाजू, नंदा पाचपुते, मन्नाबी शेख, हिरा देशमुख, अलका दरंदले, शोभा लांडगे, सुजाता शिंदे, भागीरथी पवार, मुक्ता हसे, रतन गोरे, संगीता विश्वास, अरूणा खळेकर, अलका नगरे, शशिकला औटी, ताराबाई आसने, वैजयंती ढवळे, मनिषा माने, मंदा निकम, नजराना शेख, ज्योती डहाळे, वंदना गमे, मनिषा जाधव, शोभा विसपुते, शोभा येवले, सुनिता पवार, शर्मिला रणधीर, बेबी आदमाने, मीना धाकतोडे, चंद्रकला विटेकर, हिरा देशमुख, रोशन शेख, अलका आदिक, सुनीता धसाळ आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संप सुरू आहे. १५ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मोर्चा काढूनही शासनाने संपासंदर्भात कोणताही सकारात्मक तोडगा काढला नाही. शासनाशी वारंवार चर्चा सुरू असून, अद्याप मार्ग निघालेला नाही. उलट संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. आंदोलन दडपण्यासाठी बेकायदेशीर व अन्यायकारक मार्गाचा अबलंब करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. मागण्यांचे निवेदन महिला व बालकल्याण समितीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांना देण्यात आले.