देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरातील व परिसरातील कोरोना रुग्णांसाठी येथील डॉक्टर विनामोबदला सेवा देत देवदूत बनले आहेत.
पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये येथील डॉ. बजरंग करंजुले, डॉ. सूर्यकांत राऊत, डॉ. जालिंदर जासूद यांनी दाखल झालेल्या ९४ रुग्णांवर योग्य औषधोपचार करत ६४ रुग्णांना ठणठणीत बरे केले आहे.
कोविड सेंटरमध्ये सध्या २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सात रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी दाखल केले आहे. या सर्व देवदूतांनी रुग्णांशी आपुलकीने वागताना विनामोबदला सेवा देत रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे त्यांच्यातील कोरोनाविषयीची भीती नाहीशी झाली आहे. येथे दाखल झालेले रुग्ण खेडेगावातील मजूर, कामगार, कष्टकरी, शेतकरी वर्गातील आहेत. या खेड्यातील गरीब रुग्णांसाठी हे कोविड सेंटर आरोग्य मंदिर बनले असून सर्व डॉक्टर्स रुग्णांसाठी देवदूत म्हणून आरोग्य सेवा देत आहेत. येथे रुग्णांची काळजी घेताना त्यांना योग्य आहार व सर्व सुविधा पुरविण्याचे काम स्वयंसेवक करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
---
येथील कोरोना रुग्णांची सेवा केल्यामुळे आत्मिक समाधान मिळत आहे. रुग्णांना योग्य औषधोपचार, योग्य आहार देण्यावर आम्ही भर देत आहोत. या संकाटाच्या काळात आमच्या हातून विनामोबदला रुग्ण सेवा घडत आहे. सामाजिक कार्यात हातभार लावू शकलो हे आमचे भाग्य आहे.
डॉ. सूर्यकांत राऊत,
देवदैठण
---
२२ जालिंदर जासूद, सूर्यकांत राऊत, बजरंग करंजुले