अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तप संपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठाही ओवी आहे संत एकनाथ महाराजांची. अपमान झाल्यानंतर क्रोध कसा वश होतो, त्याचे ते वर्णन नाथ महाराज करतात. थोडा जरी अपमान झाला तर चांगले चांगले म्हणविणारे तपस्वी क्रोधाला वश होतात. ते अपमान करणाºयाला शाप देऊन आपली तप:संपत्ती वाया घालवितात आणि आपल्या अनुष्ठान निष्ठेपासून भ्रष्ट होतात. शापाच्या प्रखर वाणीने स्वत:च्या तपापासून भ्रष्ट होतात. जे अथांग समुद्र तरून जातात, त्यांनी गाईच्या खुराच्या खळगीत साठलेल्या पाण्यात बुडावे, त्याप्रमाणे कामाला जिंकून जे पुढे जातात. तेही क्रोधाकडून लुटले जातात. कोणी तरी भोगाला प्रतिबंध करतो. तेव्हाच क्रोध हा बळकटपणे ठाम मांडतो. पण काम क्रोध हे दोन्ही अभक्तांना बाधा करतात. हरिभक्तापुढे त्याचे काहीच चालत नाही. भक्ताकरिता जर कामक्रोधांची बाधा नाही तर मग नारायणा, तू तर भक्तपती आहेस. तुला आमचा कामक्रोध कसा बाधू शकेल, असा सवाल संत एकनाथ महाराज करतात. हे पुरूषोत्तमा, कृपाळू देवा, माझा महिमा न जाणता आम्ही आमच्या नीच स्वभाव धर्माप्रमाणे केले. पण देवा तुझ्याजवळ अखंड स्वाभाविक क्षमा आहे. ही क्षमाच आम्हाला तारू शकेल, अशी अपेक्षाही नाथ व्यक्त करतात. शेवटी भगवंतांचा कृपाळू भाव हा महत्त्वाचा आहे.
क्रोधामुळे तपस्वीताही नष्ट होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:55 PM